
१३ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार”
मुंडीपार येथे भेल प्रकल्पासमोर श्रद्धांजली अर्पण; बेरोजगार युवकांचा संताप, औद्योगिक विकास ठप्प झाल्याचा आरोप — प्रकल्प सुरू करा अन्यथा दुसरा उद्योग आणा, प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे आक्रमक मागणी
साकोली :तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे उभारण्यात येणारा बहुचर्चित भेल (BHEL) प्रकल्प गेल्या तब्बल तेरा वर्षांपासून रखडलेला असल्याच्या निषेधार्थ बुधवारी दि. १३ मे २०२६ रोजी प्रकल्पस्थळी “१३ वी पुण्यतिथी” कार्यक्रम आयोजित करून आंदोलनात्मक पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “भेल प्रकल्पाचे स्वप्न अखेर मृत अवस्थेत पोहोचले आहे” असा तीव्र आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवक आणि आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व भेल समितीचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी केले. यावेळी राजेश भदाडे, खुशाल बागडे, सरपंच मनोरमा हुमणे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी, युवक व नागरिक उपस्थित होते.
५०० एकर जमीन संपादित… पण उद्योगाचा मागमूस नाही
तेरा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकारातून मुंडीपार परिसरात भेल कंपनीचा मोठा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पामुळे परिसरात औद्योगिक क्रांती होईल, हजारो युवकांना रोजगार मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि साकोली तालुक्याचा कायापालट होईल, अशी स्वप्ने दाखविण्यात आली होती.
त्या अनुषंगाने परिसरातील शेतकऱ्यांची जवळपास ५०० एकर सुपीक शेती भूसंपादन करून घेण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिढीजात जमिनी उद्योगाच्या नावाखाली दिल्या. मात्र तेरा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रकल्प सुरू होण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
“औद्योगिक विकास रोखणाऱ्यांना श्रद्धांजली” — आंदोलकांचा घणाघात
यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक “तेरवी” साजरी करून औद्योगिक विकास रोखणाऱ्या राजकीय नेतृत्वावर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी मोठमोठी आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात प्रकल्प उभा राहिला नाही. त्यानंतरच्या काळातही विविध सरकारांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.
“माजी मंत्र्यांच्या दबावाखाली सरकार काम करत राहिले, पण प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस इच्छाशक्ती दाखविण्यात आली नाही. परिणामी बेरोजगार युवकांचे भविष्य अंधारात गेले,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
बेरोजगारी, स्थलांतर आणि विकास ठप्प
भेल प्रकल्प सुरू झाल्यास हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, ancillary उद्योग उभे राहतील आणि संपूर्ण परिसराची आर्थिक परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रकल्प रखडल्यामुळे बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झाली असून अनेक युवकांना रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
औद्योगिक धोरणातील दुर्लक्षामुळे साकोली परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
आंदोलनादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी शासन व भेल प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये —
भेलने तातडीने लेखी प्रकल्प अहवाल (Project Report) सादर करावा
MIDC लीज परत देण्यास तयार असल्याचे स्पष्ट करावे
भेल प्रकल्प सुरू करण्यास असमर्थ असल्यास त्या ठिकाणी दुसरा मोठा उद्योग प्रकल्प आणावा
प्रकल्पग्रस्तांना अधिकृत दाखले देण्यात यावेत
CSR निधीचा परिसर विकासासाठी वापर करावा
बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा
अशा मागण्यांचा समावेश होता.
यापूर्वीही आंदोलने; तरीही प्रशासन उदासीन ?
भेल प्रकल्पासंदर्भात यापूर्वीही प्रकल्पग्रस्तांकडून विविध आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.
आजच्या आंदोलनानंतर आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून चर्चेसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती असून, पुढील प्रक्रियेबाबत व्हीसीच्या माध्यमातून चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र केवळ चर्चा नव्हे तर प्रत्यक्ष निर्णय आणि कृती हवी, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.
“तेरवी नव्हे, उद्योग सुरू होण्याचा दिवस पाहायचा” — प्रकल्पग्रस्तांची भावना
“तेरा वर्षांपासून आश्वासनांचेच राजकारण सुरू आहे. आमच्या जमिनी गेल्या, पण रोजगार मिळाला नाही. आता सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. आम्हाला प्रकल्पाची तेरवी नव्हे तर उद्योग सुरू होण्याचा दिवस पाहायचा आहे,” अशा शब्दांत प्रकल्पग्रस्तांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली.