
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : घरावरील जागेच्या जुन्या वादातून मध्यरात्री अंगणात झोपलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर आणि गालावर ब्लेडने प्राण घातक हल्ला करणाºया दोन्ही आरोपींना सिहोरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने व तांत्रिक तपास करत काल २४ मे रोजी रात्री ९ वाजता अटक केली आहे. राजू बंसीलाल राऊत (२४) रा. हरदोली असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी शैलेश चरण राऊत (३८) रा. हरदोली, ता. तुमसर आणि कुणाल रामु राऊत (३०) रा.हरबंश कॉलनी, हिंगणा रोड, नागपूर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू राऊत हा १७ एप्रिल च्या रात्री आपले मोठे वडील रतन राऊत यांच्या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपला असताना, १८ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या अंगावर असलेले ब्लँकेट ओढून गळ्यावर व गालावर धारदार ब्लेडने सपासप वार केले. राजूने आरडाओरड करत प्रतिकार केला असता दोन्ही अनोळखी तरूण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. गंभीर जखमी राजूला तुमसर येथील खाजगी रुग्णालयात व नंतर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला आरोपीं बाबत कोणतेही पुरावेसमोर आले नसल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. परंतु, पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कसोधन, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा आणि सायबर पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषण केले. यात जखमी राजूच्या घराच्या जागेचा जुना वाद असल्याचे समोर आले आणि याच वादाचा सूड उगवण्यासाठीच आरोपी शैलेश राऊत व कुणाल राऊत यांनी हा कट रचून ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. पुरावे हाती लागताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या हे उल्लेखित आहे.