
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोसमी पावसाने आगमनाची वर्दी दिली असली तरीही राज्यातील अनेक भागात अजूनही तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. आजपासूनच म्हणजे २५ मे पासून ‘नवतपा’ सुरू झाल्याने आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता यंदाचा नवतपा चांगलाच तापणार असे संकेत आहेत. नवतपा म्हणजेच उन्हाळ्यातील सर्वाधिक नऊ उष्ण दिवस. यावर्षी तो २५ मेपासून सुरू झाला असून २ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. नवतपाच्या काळात सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाºयांनी टोक गाठलेले असते. उत्तर व पश्चिम भारतात या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकतो. मात्र, याचवेळी २८ ते ३० मे या कालावधीत या भागात तीव्र वादळाचाही इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात आणि विशेषकरुन विदर्भात २५ ते ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहणार आहेत.
हिंदू पंचांगानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्यावेळी नवतपा सुरू होतो. या काळात तापमानाचा पारा ४५ ते ५२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतो. तर विज्ञानानुसार या काळात सूर्य कर्क रेषेजवळ येतो. त्यामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात आणि उष्णतेत प्रचंड वाढ होते. हे दरवर्षीचे चक्र असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या सुरुवातीला नवतपाच्या काळात नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागतो. या दिवसात दूपारच्यावेळी प्रचंड उकाडा असतो. एवढेच नाही तर उष्ण वारे आणि अंगाची लाहीलाही करणारे ऊन यामुळे नागरिक हैराण होतात. तब्बल नऊ दिवस ही परिस्थिती कायम राहत असल्याने त्याला नवतपा असे म्हणतात. उन्हाची दाहकता या कालावधीत वाढत असल्याने उष्माघात, अशक्तपणा, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या कालावधीत शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटणे यासारखी लक्षणे जाणवतात. विशेषकरुन लहान मुले आणि घरातील ज्येष्ठांना व बाहेर काम करणाºया नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे नवतपाच्या काळात दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.