निखिल कांबळे हत्याकांडाचा तपास वेगात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गडकुंभली रोड परिस- रातील तलाव काठावर घडलेल्या निखिल राजकुमार कांबळे हत्याकांड प्रकरणात साकोली पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून आरोपींविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात गणेश मनोहर वलथरे, कमलेश चुन्नीलाल कुकवास, सागर शंकर पारधी, ओमकार सुनील मेश्राम यांना अटक केली असून एक विधीसंघर्षग्रस्त बालक सुद्धा आरोपी आहे. अवघ्या १२ तासांत आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी या थरारक हत्याकांडाचा उलगडा केला.

न्यायालयाने आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या काळात पोलिसांकडून तपासाची साखळी अधिक मजबूत करण्यात येत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, निखिल कांबळे हा मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत फिरत होता. त्यानंतर सर्वजण एकत्र बसून नशा करत असताना त्यांच्यात वाद झाला. नशेच्या भरात झालेली अश्लील शिवीगाळ, जुन्या वादाची खुन्नस आणि संताप यामुळे परिस्थिती चिघळली. त्यानंतर आरोपींनी निखिलवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. छाती, मान आणि डोक्यावर गंभीर प्रहार करण्यात आले. जखमी अवस्थेत तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह गडकुंभली रोडवरील तलाव परिसरात आणून टाकला आणि घटनास्थळावरून पसार झाले. आरोपींनी चौकशीत हत्या तलाव परिसरातच केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा सखोल तपास सुरू केला. तलावाच्या काठासह पाण्यात उतरून चुंबकीय साहित्याच्या आधारावर शोधमोहीम राबविण्यात आली.

पोलिसांच्या पथकाने तलावातून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू शोधून काढला. तसेच निखिलच्या डोक्यावर प्रहार करण्यासाठी वापरण्यात आलेला दगडही घटनास्थळ परिसरातून जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही वस्तूंना तपासातील महत्त्वाचे पुरावे मानले जात असून फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिस तपास अधिक मजबूत करत आहेत. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि साकोली पोलीसांचे पथक आरोपींविरोधात न्यायालयात सक्षम बाजू मांडण्यासाठी पुरावे गोळा करण्यात व्यस्त असून तलावात उतरून शस्त्र शोधणाºया पोलिसांच्या या कारवाईची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *