
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी कडून चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . मोहाडी तालुक्यातील खडकी येथील रहिवासी आणि सध्या श्रीराम नगर, तुमसर येथे राहणारे बांधकाम कंत्राटदार चंद्रशेखर श्रीराम सार्वे (४२) यांनी तक्रार दिली होती की, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ते घराला कुलूप लावून कामावर गेले असता, अज्ञात चोराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून ४० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि ३० रुपयांची रोकड, असा एकूण ७०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना तुमसर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, त्या आधारे तपास पथकाने मालवीय वार्ड, तुमसर येथून संशयित आरोपी प्रदीप प्रेमलाल गौरे, ४७ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली सोन्याची दागिने जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी प्रदीप गौरे याने तुमसर पोलीस ठाणे हद्दीत सन २०२६ मध्ये एकूण ५ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या ५ घरफोड्यांमध्ये एकूण २,९३,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. हे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि तुमसर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम, पोलीस हवा. शरद रामटेके, पो.शि. बळदे, राजकुमार गिरीपुंजे, नितीन झंझाड, विजय दमाहे आणि अजय बावणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.