
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी ‘एक तुकाराम हवा’ ही प्रभावी कविता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कवितेतून अन्नातील भेसळ, औषधातील फसवणूक, प्रशासनातील भ्रष्टाचार आणि कामचुकार वृत्तीवर तीव्र शब्दांत प्रहार करण्यात आला आहे. कवितेच्या ओळींतून कवीने समाजातील वाढत्या अनैतिकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘विषमय झाले अन्न, जिवघेणा झाला दवा’ अशा शब्दांत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया प्रवृत्तीवर रोष व्यक्त करत, अशा परिस्थितीत जनतेचे रक्षण करणारा निर्भय आणि प्रामाणिक नेता ‘तुकाराम’ आजच्या काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. दूध, पनीर, खवा यांसारख्या दैनंदिन अन्नपदार्थांतील भेसळीपासून ते पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाºया प्रवृत्तीपर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांना कवितेत हात घालण्यात आला आहे. तसेच उच्च पदांवर असलेल्या भ्रष्ट अधिकाºयांवर आणि लाचखोर व्यवस्थेवरही कवीने सडकून टीका केली आहे.
कवितेत पुढे कामचुकारपणा, शिस्तभंग, आणि हरामाच्या पैशाची लालसा यांसारख्या सामाजिक दोषांवर प्रकाश टाकत, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर, प्रामाणिक आणि निडर नेतृत्वाची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ही कविता केवळ शब्दांचा संग्रह नसून, ती एक सामाजिक संदेश देणारी हाक आहे. ‘रयतेच्या हितासाठी झुंजणारा एकटाच’ असा नेता आजच्या समाजाला हवा आहे, अशी भावना यातून प्रकर्षाने मांडली गेली आहे. ‘एक तुकाराम हवा’ ही कविता सध्याच्या व्यवस्थेवर भाष्य करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारी ठरत असून, समाजातील चुकीच्या प्रवृत्तीविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा देत आहे.