झाडे लावण्यापेक्षा आधी मोठे वृक्ष वाचवा; पावसाअभावी नागरिकांची आर्त हाक

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पाऊस थांबलेला नाही, आपणच त्याला थांबवलं आहे,’ अशी भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड, नद्यांचे आटलेले प्रवाह आणि डोंगरांची झालेली नासधूस यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, केवळ दरवर्षी झाडे लावण्याच्या घोषणा करून उपयोग नाही, तर आधी अस्तित्वात असलेली मोठी आणि जुनी वृक्षसंपदा जपणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मोठे वृक्षच पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

मात्र शहरीकरणाच्या वाढत्या वेगात हीच वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. नळाचे पाणी बंद झाल्यावर जसा नागरिकांचा संताप उसळतो आणि नगर पालिकेवर मोर्चे काढले जातात, तसाच आक्रोश आता पर्यावरण वाचवण्यासाठीही दिसून यायला हवा, अशी मागणी होत आहे. प्रत्येक शहरात ‘वडिलोपार्जित वृक्षसंपदा’ वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ‘आजही वेळ गेलेली नाही; निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा,’ असा संदेश देत पर्यावरणप्रेमींनी नागरिकांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा येणाºया काळात पाणीटंचाई, दुष्काळ आणि वाढते तापमान यांचा सामना करावा लागणार, असा इशाराही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *