तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईचा धसका?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील गुंजेपार मार्गावर सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. गुंजेपार रोडवरील नाल्याजवळ पोहोचल्यानंतर पाण्याची पातळी पाहण्यासाठी खाली डोकावून पाहिले असता नाल्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या औषधांचा साठा टाकलेला असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नाल्यात पडलेल्या औषधांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या, औषधांची पाकिटे व इतर वैद्यकीय साहित्य असल्याचे दिसून आले. ही औषधे नेमकी एक्सपायर झालेली आहेत, डुप्लिकेट आहेत की इतर कोणत्या कारणामुळे टाकण्यात आली आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अलीकडील काळात औषध विक्रीतील गैरप्रकार, एक्सपायर औषधांची विक्री तसेच डुप्लिकेट औषधांविरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर काही औषध विक्रेत्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीपोटी आपल्या दुकानातील एक्सपायर किंवा संशयित औषधांचा साठा गुपचूप नाल्यात फेकून दिला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषत: प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कठोर कार्यपद्धतीचा धसका घेतल्याने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. औषधांमधील रासायनिक घटक नाल्याच्या पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषण होण्याची तसेच परिसरातील पर्यावरण आणि जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जाते.

या संपूर्ण प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नाल्यात टाकण्यात आलेली औषधे कोणत्या फार्मसी किंवा वितरकाची आहेत, त्यांचा कालावधी संपलेला होता का आणि ती नियमबाह्य पद्धतीने का फेकण्यात आली, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.जर ही औषधे नष्ट न करता बाजारात विक्रीसाठी गेली असती, तर नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ झाला असता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *