
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या भोजापूर गावातील हनुमान मंदिरातील हनुमंताची मूर्ती अज्ञात व्यक्तीने फोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक भावना दुखावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २४ जून २०२६ रोजी सायंकाळच्या दरम्यान भोजापूर गावातील हनुमान मंदिरात काही ग्रामस्थ दर्शनासाठी गेले असता मंदिरातील हनुमंताची मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आढळून आली.
सुरुवातीला मूर्तीला काही अपघाती धक्का बसला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आली; मात्र जवळ जाऊन पाहिल्यानंतर कोणीतरी जाणीवपूर्वक मूर्तीची तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती गावात पसरताच मंदिर परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. मूर्तीचे नुकसान झाल्याचे पाहून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. अनेकांनी हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत दोषी व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यास सुरुवात केली तसेच संबंधितांकडून प्राथमिक माहिती घेतली.
मूर्तीची तोडफोड नेमकी कशी झाली, हा प्रकार कोणत्या वेळी घडला आणि यामागे कोणाचा हात आहे, याबाबत पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे भोजापूर गावासह परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून मंदिर परिसरात सुरक्षा वाढविण्याची मागणीही पुढे येत आहे. गावकºयांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, धार्मिक स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटना रोखण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित गस्त आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे.