चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाने भंडारा हादरले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर कथित लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३० वर्षीय संशयित युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संशयित मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली असली, तरी याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने स्वत:लाच दुखापत करून घेतल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पीडित चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून प्रकरणाशी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले असून सखोल तपास सुरू आहे. घटनेची माहिती शहरभर पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. सायंकाळी सुमारे पाच वाजल्यानंतर संशयितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिक रुग्णालयाबाहेर जमले. आरोपीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. काही आंदोलकांनी आरोपीला जनतेच्या ताब्यात देण्याची मागणीही केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रुग्णालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. अतिरिक्त पोलिस दल बोलावून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उशिरापर्यंत रुग्णालयाबाहेर नागरिकांचा निषेध सुरू होता. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष, जलद व सखोल चौकशी करून दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *