सोमनाळा बुजच्या धर्तीवर जिल्ह्यात १०० शाळा विकसित करण्याचा उपक्रम

लोकसहभागातून उभारलेल्या निधीला प्रशासनाकडून दुप्पट सहकार्य; जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा पुढाकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बुज येथे लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व भौतिक विकासाच्या उपक्रमाची दखल घेत, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील १०० शाळा विकसित करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी सावन

कुमार यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून लोकसहभागातून उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षकांच्या साध्यंची निवड करून त्यांच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. लोकसहभागातून एखाद्या शाळेने ५ लाख रुपये निधी उभारल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे १० लाख रुपयांपर्यंतचे सहकार्य प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व हितचिंतक यांच्या सहभागातून शाळांच्या विकासाला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

याददर्भात झालेल्या बैठकीत सोमनाळा बुज शाळेच्या विकासाचा अनुभव प्रत्यक्ष सादरीकरणातून मांडण्यात आला. लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक दिगंबर कुंडलक वंजारी यांनी प्रेझेंटेशनव्दारे शाळेच्या विकासाची संपूर्ण वाटचाल उपस्थितांसमोर मांडली. शाळेच्या गरजा ओळखण्यापासून लोकसहभागाची संकल्पना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, लोकवर्गणी संकलित करणे, उपलब्ध निधीचे काटेकोर नियोजन करणे आणि त्यातून टप्प्याटप्प्याने

विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा निर्माण करणे, या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, वाचनालय, संगणक शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसह विविध विकासकामे लोकसहभागातून कशा पद्धतीने उभी राहिली, याची माहिती छायाचित्रे व प्रत्यक्ष कामांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. एकाच वेळी मोठ्या निधीची अपेक्षा न करता उपलब्ध लोकसहभागातून एकेक गरज पूर्ण करत शाळेच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, हा प्रयोगाचा महत्त्वाचा संदेश असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

सोमनाळा बुज शाळेचा हा अनुभव आता निवड होणाऱ्या १०० शाळांना मार्गदर्शक ठरणार असून, या शाळांना लोकवर्गणी संकलन, नियोजन, लोकसहभाग वाढविणे आणि शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांबाबत सोमनाळा बुज शाळेकडून मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे.

एकही जिल्हा परिषद शाळा बंद पडू नये, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा मिळवण्यात आणि जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने प्रशासन, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळा विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीस जिल्हाधिकारी सावन कुमार, शिक्षणाधिकारी संगीता माने, लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक दिगंबर वंजारी, गौतम सर, शिक्षण विस्तार अधिकारी वासनिक, जिल्हा परिषद शाळा सोमनाळा बुजचे अध्यक्ष धनंजय वंजारी, माजी अध्यक्ष दुर्योधन बोरकर, मुख्याध्यापक हरिदास घावळे तसेच राज गिरडकर उपस्थित होते.

‘जिल्हाधिकाऱ्यांचा हा उपक्रम अत्यंत सस्तुत्य असून जिल्हा परिषदेच्या शाळांना नवसंजीवनी देणारा आहे. आपल्याला मिळालेल्या अनुभवाच्या आधारा पे परिवर्तनच्या प्रक्रियेत आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.’

दिगंबर वंजारी ,शिक्षणतज्ज्ञ तथा लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *