सिल्ली परिसरातील पिकांवर किडींचा कहर; शेतकरी हवालदिल

तीन-तीन वेळा महागडी औषधांची फवारणी करूनही किडींचा बंदोबस्त नाही; वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत

भंडारा पत्रिका/वार्ताहर

सिल्ली : यंदाच्या खरीप हंगामात चांगले पीक येईल, कर्जाचा भार हलका होईल आणि कुटुंबाच्या गरजा भागतील, या आशेने शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला. मात्र, आता शेतातील उभ्या पिकावर विविध किडींचा वाढता प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. पिके डोळ्यांसमोर असताना त्याच्यावर किडीचा कहर सुरू असल्याने सिल्ली परिसरातील शेतकरी अक्षरशः चिंतित आणि हवालदिल झाले आहेत.

परिसरातील अनेक शेतामध्ये खोडकिडा, गादमाशी, मावा, तुडतुडे यांसह विविध किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सुरवातीला किरकोळ स्वरूपात दिसणाऱ्या किडींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उबे पीक डोळ्यांसमोर कमजोर होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. तीन-तीन वेळा फवारणी, तरीही किडींचा बंदोबस्त नाही

किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ऐपतीनुसार महागडी कीटकनाशके खरेदी करून तीन-तीन वेळा फवारणी केली. फवारणीसाठी औषधाचा खर्च, मजुरी आणि इतर खर्चाची मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, एवढा खर्च करूनही किडींचा प्रादुर्भाव अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

एीकडे पीक वाचविण्यासाठी औषधांवर पैसा खर्च करायचा आणि दुसरी कडे पीक हातचे जाण्याची भीती, अशा दुहेरी संकतात शेतकरी सापडला आहे. फवारणीचा खर्च वाढत आहे; मात्र उत्पन्नाची खात्री राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या खर्चाने शेतकरी आर्थिक कोंडीत

शेतीचा उत्पादन खर्च आधीच वाढला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत आणि इतर खर्चाचा भार शेतकऱ्यावर आहे. त्यात आता किडींच्या नियंत्रणासाठी बारवार फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी शेतीचा हंगाम उभा करण्यासाठी कर्ज घेतले आहे. पीक चांगले आले तर कर्जाची परतफेड करता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पीक वाचेल की नाही, उत्पादन खर्च निघेल की नाही आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या प्रश्नांनी शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

उभ्या पिकाकडे पाहताना डोळ्यांत चिंता

शेतकऱ्यांसाठी शेतातील पीक म्हणजे केवळ धान्य नसते; त्यामागे संपूर्ण कुटुंबाच्या वर्षभराच्या अपेक्षा, कर्जफेडिचे नियोजन आणि भविष्यातील स्वप्ने जोडलेली असतात. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक किडींच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या चितित भर पडली आहे.

यंदा चांगले उत्पादन मिळेल, या आशेने मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल किडींच्या प्रादुर्भावामुळे मातीमोल होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत

सिल्ली परिसरातील पिकांची कृषी विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाची सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. किडींचा प्रादुर्भाव आळını बाळण्यापूर्वी कृषी विभागाने तज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रभावी उपाययोजना आणि आवश्यक कीटकनाशकाबामत माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकरी आधीच वाढत्या उत्पादन खर्च, कर्जाचा भार आणि बाजारारातील अनिश्चिततेशी जुझ देत आहे. त्यात आता किडींच्या संकटाची भर पडली आहे., त्यामुळे प्रशासनाने कागदी पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात उतरून परिस्थितीची दखल घ्यावी आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *