विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना कर्णकर्कश डीजे

तिघांवर साकोली पोलिसांची कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

साकोली : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मोठ्या व कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या तिघाविरुद्ध साकोली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. १९ सप्टेंबर रोजी जमनापूर रोड परिसरात टाटा ४०७ मालवाहु वाहन क्रमांक एमएच-२९-टी-४२६२ वर डीजे लावून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधितांना आवाज कमी करून नियमांचे पालन करण्याची स्पष्ट सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही डीजे मोठ्या आवाजात सुरू ठेवण्यात आला.

पोलिसांनी डीजे वाजविण्यासाठी आवश्यक परवानगीबाबत विचारणा केली असता संबंधितांकडे आवश्यक परवानगी नसल्याचे समोर आले. मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कारवाई केली.

या प्रकरणी डीजे मालक सुनील गोपाल भुरे (३५, रा. लाखनी), डीजे ऑपरेटर प्रतिक मिलिंद कांबळे (३१, रा. केसलवाडा/वाघ) आणि वाहन चालक आशिष संजय पंधरे (३२, रा. लाखनी) यांच्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ तसेच लागू मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली.

नियमंचे पालन करण्याचे आवाहन

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन साकोली पोलिसांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *