आंदोलनापूर्वीच अटक; ‘ही लोकशाहीची हत्या’!

 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांचा घणाघात

 

काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : SIR अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत होत असलेल्या कथित फेरफारांच्या निषेधार्थ तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनापूर्वी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरेकर यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेते. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, ‘मला झालेली अटक ही लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मला घरातून ताब्यात घेणे हा लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या अधिकारांवर घाला आहे, असे म्हटले.

ते पुढे म्हणाले की, मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. मतदार यादीत पात्र मतदारांची नावे सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. SIR प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तरे द्यावीत.

काँग्रेसच्या निवेदनात SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदार यादीतील बदल, नावे वगळण्याची प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या काळ प्रणालीच्या केंद्रीकरणाबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

‘मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे,’ अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *