लाखनी तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर

 

‘जगावे की मरावे’ प्रश्न निर्माण

 

रवि धोतरे / भंडारा पत्रिका

लाखनी :- राज्य शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत लाखनी तालुक्याचे नाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. पुन्हा पंचनामे करून नुकसानग्रस्त गावांची यादी करून लाखनी तालुक्याला दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात सरासरी ८८ टक्के पाऊस पडलेला आहे. यात मंडळानुसार पोहरा ७८.९ टक्के, लाखनी १०६.८ टक्के, पालांदूर (चौ.) ८४.१ टक्के, पिंपळगाव (सडक) ९५.७ टक्के, मुरमाडी (तुपकर) ९२.९ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यात २३ हजार ६३९ हेक्टर कृषीलागवड क्षेत्रापैकी २२ हजार ३८८ हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड केली आहे. तालुक्यात २२९.५० हेक्टर भागात भाजीपाला तर १.२० हेक्टर भागात कापूस, २.४० हेक्टर भागात उसाची लागवड केली आहे.

तालुक्यातील लाखोरी येथील मयूर भांडारकर या शेतकऱ्याने पावसाअभावी आपले १४ एकर क्षेत्रापैकी ७ एकर शेतात पावसाअभावी रोवणी केली नसल्याने त्याच्यापुढे जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ट्रिगर १ मध्ये लाखनी तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे तर दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी, जिल्हा कृषी अधीक्षकांनी सर्वेक्षण न करता पाठवलीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळेच तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. शासनाला चुकीचा अहवाल पाठविणाऱ्या जिल्हा कृषी अधीक्षकांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

तालुक्यात रोवणी झालेले धानपिक शेतकरी रोगराईमुळे त्रासले आहेत. तुडतुडा, खोडकिडा यामुळे धानपिक खराब झाले आहे. पावसाची अनियमितता असल्यामुळे धान पिकाचे उत्पन्न अध्यापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. धान शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येतो व दूषित वातावरणामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धान शेतकऱ्यांना जुजबी नाही तर ठोस मदत करणे आवश्यक आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *