
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम सातलवाडा व रेंगेपार शेतशिवार परिसरात गेल्या काही दिवसां पासून कृषी विद्युत पंप मोटारींच्या चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले होते. जवळपास आठ ते नऊ कृषी पंप मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, १ जानेवारी रोजी चोरीस गेलेल्या मोटारींचा खरेदी-विक्रीसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर गावकºयांना संशय बळावला. त्याच आधारावर गावातीलच एका संशयित चोरट्याला पकडून पोलिसांना कळविण्यात आले.
मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्याने संतप्त ग्रामवासीयांनी घटनास्थळीच कारवाईची मागणी करत पोलिसांचा घेराव केला. हा प्रकार १ जानेवारी रोजी सायंकाळी सातलवाडा येथे घडून आला. फिर्यादी रवींद्र गुलाब कावळे (रा. रेगेपार, ता. साकोली, जि. भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील बोरवेलमध्ये असलेली मोटार पंप, मोटारपंपसह केबल वायर तसेच मोटारला बांधलेली दोरी असा एकूण १८ हजार रुपयांचा माल अज्ञात इसमाने चोरी केला. यासोबतच शेतातील पाईपलाईनची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या परिसरात कृषी पंप मोटारच नव्हे तर शेताच्या बांधावरून धान चोरीसारख्या घटनांमध्येही वाढ झाली असून ग्रामवासीयांचा रोष थेट बीट अंमलदारावर आहे. बीट अंमलदाराच्या निष्क्रिय कार्यप्रणालीमुळेच चोरट्यांना आश्रय मिळत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार होणाºया चोरीच्या घटनांकडे पोलिसांनी डोळेझाक केल्याने गावात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या तीव्र संतोषानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे साकोली येथे आणले असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वडुले (पो. स्टे. साकोली) करीत आहेत. मात्र, सातत्याने घडणाºया चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.