संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मंगळवारी (६ ऑक्टो.) जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आणि प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात यंदा अनेक भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यातच उर्वरित पिकांवर ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शासनाने भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील शेतकऱ्यांनाही कमी पाऊस, पीक नुकसान आणि रोगराईचा फटका बसल्याने संपूर्ण जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता हेक्टरी एक लाख रुपये सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी हेमंत महाकाळकर, नरेंद्र झंझार्ड, देवचंद ठाकरे, विजय सावरबांधे, राजुभाई पटेल, यशवंत सोनकुसरे, उमेश तुरकर, योगेश सिंगनजुळे, बाळूभाऊ चुन्ने, उमराव आठोडे, पवन चव्हाण, अंगराज समरीत, उत्तम कडपाते, मनीय वासनिक, भानुदास बनकर, दिनेश हरडे, लता मेश्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *