चौकशीचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायतीतील ग्रामसभा आणि विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. चौकशीचे आदेश मिळेपर्यंत जिल्हा परिषद दालनातून उठणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
पिंडकेपार ग्रामपंचायतीतील कामकाजाची चौकशी यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आली होती. मात्र, चौकशी अधिकारी उपस्थित न राहिल्याने चौकशी पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे चौकशीला विलंब का होत आहे, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला.
लहान मुलांसह महिलांचाही सहभाग
या ठिय्या आंदोलनात गावातील महिला आणि लहान मुलांदेखील मोठ्या संख्येत सहभागी झाले. ग्रामपंचायतीतील विकासकामे, ग्रामसभा आणि इतर कामकाजाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत चौकशीचे तातडीने आदेश देऊन प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी चौकशीबाबत प्रशासनाकडून स्पष्ट लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली.
चौकशीचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषद कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे पिंडकेपार ग्रामपंचायतीच्या चौकशीचा मुद्दा आता जिल्हा परिषद प्रशासनासमोर ऐरणीवर आला आहे. प्रशासन या मागणीची दखल घेत चौकशीचे आदेश कधी देते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.