
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील शिक्षकांना एकस्तर पदोन्नती अंतर्गत उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी तसेच इतर पदांना वरिष्ठ पदोन्नतीनुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासन परिपत्रकांचा अभ्यासपूर्ण संदर्भ देत जिल्हा परिषद प्रशासनाला शासन निर्णयाची सविस्तर मांडणी केली. त्यानंतर लवकरच सुधारित पद्धतीने एकस्तर पदोन्नती लागू करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्ह्यातील शिक्षकांना सुधारित एकस्तर पदोन्नतीनुसार वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी मागील पाच महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षक पदाचे पदोन्नतीचे पद ‘उच्चश्रेणी मुख्याध्यापक’ असल्याने त्यांना एकस्तर पदोन्नती अंतर्गत एस१३ ऐवजी एस-१४ वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, अशी मागणी समितीने केली होती. तसेच पदवीधर शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापकांना समोरील पदाच्या पदोन्नतीनुसार वेतन लाभ देण्याचाही मुद्दा समितीने मांडला. या सर्व बाबींवर सकारात्मक भूमिका घेत मुरुगानंथम यांनी लवकरच आवश्यक आदेश निर्गमित करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले. शिक्षक समितीने मांडलेल्या मागण्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांनी विशेष सहकार्य केल्याचे समितीने नमूद केले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, उपाध्यक्ष एच. एस. बिसेन, कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, गौतम बांते, राज कडव, उमेश रहांगडाले, देवेंद्र बरया, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ममता येडे, भारती तिडके, मीनाक्षी पंधरे, मीनाक्षी रहांगडाले, वंदना झोडे, हेमलता मोरघडे यांसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.