तुमसरमधील दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाºया दोन सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये एमपीडीए (टढऊअ) कठोर कारवाई केली आहे. दोन्ही आरोपींना एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश उर्फ डिकरा रमेश महालगावे (वय ३०, रा. अभ्यंकर नगर, तुमसर) आणि किरण उर्फ लारा अशोक मारबते (वय ३०, रा. माकडे नगर, तुमसर) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांचा आढावा घेऊन हा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला.

उपलब्ध पुरावे, गोपनीय माहिती आणि पोलीस अहवालांचा विचार करून सक्षम प्राधिकरणाने दोन्ही आरोपींना टढऊअ कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आकाश उर्फ डिकरा महालगावे याला १९ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. तर किरण उर्फ लारा मारबते याला ६ आॅक्टोबर २०२६ रोजी ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह, वर्धा येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. किरण मारबते याच्या स्थानबद्धतेसंदर्भात जिल्हादंडाधिकारी भंडारा सावन कुमार यांनी आदेश क्र. अ.का./दंड-१/सीआर२१/एमपीडीए/४०१/२०२६/२०२६, दिनांक ६ आॅक्टोबर २०२६ रोजी आदेश पारित केला आहे.

या कारवाईमुळे तुमसर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. सराईत गुन्हेगार, अवैध धंदे आणि समाजकंटकांविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे (ठाणेदार) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्या पर्यवेक्षणाखाली प्रवीण सयाम, नितीन झंझाड, नामदेव बळदे, राजू गिरेपुंजे, विजय दमाहे, तिलक चौधरी आणि शैलेश रतनपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *