पोलिस अधीक्षक नरुल हसन यांचे आवाहन; ध्वनिप्रदूषणाचे नियमंचे पालन करण्याचे निर्देश
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शारदीय नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणामध्ये आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नरुल हसन यांनी केले.
स्थानिक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जातीय सलोखा व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी साई किरण नंदला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलिस अधीक्षक तेजस सारडा, सचिन पवार यांच्यासह विविध उत्सव मंडळांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रोत्सवादरम्यान गरबा व दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करताना आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. Gणेशोत्सवाप्रमाणे दुर्गात्सवही डीजेमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनिफेक्षेकांच्या आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश यावेळी देण्यात आते.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा व अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही संदेशाची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.
गणेश मंडळांचा गौरव
गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनाला उत्तम सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील गणेश मंडळांना पोलिस अधीक्षक नरुल हसन यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्सव काळात मंडळांनी प्रशासनासँग समन्वय राखून सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले.
महिला सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे तसेच बेदरकार वाहन चालविण्याच्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ८०० ठिकाणी जनजागृतीपर बॅनर्स लावण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून उत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.