वेतन कपात, आठ महिन्यांपासून प्रलंबित वेतन आणि दंडाच्या वसुलीची चौकशी करण्याची मागणी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गरा-बघेडा : डोंगरी माईल : डोंगरी माईलमधील वडेकाका ग्रुपच्या माध्यमातून कंत्राटदाराच्या अधीन कार्यरत असलेल्या कामगारांच्या विविध समस्यांवर माजी आमदार चरण वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित उठऊ (अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक) आणि माईनमेट यांच्याकडे पत्रव्यवहार करून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
या बैठकीत कामगारांनी वेतनातून केली जाणारी कपात, वेतन देण्यास होणारा विलंब, कुशल व अतिकुशल कामगारांना कामाच्या स्वरूपानुसार योग्य वेतन न मिळणे, संपाच्या काळात दंडाच्या नावाखाली करण्यात आलेली वसुली तसेच मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनाचा प्रश्न मांडला. या समस्यांमुळे कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रलंबित वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
कामगार हा कोणत्याही उद्योगाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. आपल्या श्रमातून उद्योगाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या कामगारांना हक्काच्या वेतनासाठी संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब आहे. कामगारांना वेळेवर वेतन मिळणे, वेतनातील कपातीबाबत पारदर्शिता राखणे आणि कामाच्या स्वरूपानुसार योग्य मोबदला देणे आवश्यक असल्याचे चरण वाघमारे यांनी नमूद केले.
डोंगरी माईलमधील कामगारांच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत संबंधित व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. कामगारांच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान राखला गेला पाहिजे. कामगारांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, पंचायत समिती सदस्य विवेक रहांगडाले, कामगार पदाधिकारी विजय बबेंकर, विलास आडकिने यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.