हातात आलेल्या धानावर अवकाळीचे सावट सिल्लीतील शेतकरी पुन्हा संकटात !

अवकाळी पावसाने सिल्लीतील शेतकऱ्यांची दाणादाण; कापणी-मळणी आटोपली; आता धान वाळविण्याच्या वेळीच पावसाचे संकट; शेतकऱ्यांची मोठी धावपळ

भंडारा पत्रिका/वार्ताहर

सिल्ली : यंदाच्या खरीप हंगामात अनेक संकटांचा सामना करीत धान पीक कसेबसे पदरात पाडून घेणाऱ्या सिल्ली परिसरातील शेतकऱ्यांसमोर आता अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. धान्याची कापणी आणि मळणी आटोपल्यानंतर शेतकरी धान वाळवून सुरक्षितपणे घरी नेण्याच्या तयारीत असतानाच ढगाळ वातावरण आणि रिमझिम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली असून परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

सिल्ली परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी आणि मळणी पूर्ण करून मिळलेले धान अंगणात, खळ्यात तसेच मोकळ्या जागेत वाळविण्यासाठी टाकले होते. सिल्ली येथील आंबेडकर वॉर्डातील बौद्ध विहार परिसरातील काही शेतकऱ्यांनी धान वाळत घातले होते. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी झाली आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उघड्यावर वाळत घातलेले धान भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी सुरू होताच शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. कोणी ताडपत्री आणून धान झाकण्याचा प्रयत्न करीत होते, तर कोणी वाळत घातलेले धान गोळा करून पोत्यांमध्ये भरत सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धडपड होते. दिवसभर कष्ट करून आणि मोठा खर्च करून पिकविलेल्या धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना ऐनवेळी कसरत करावी लागत आहे.

धानाचा दर्जा घसरण्याची भीती

मळणी केलेले धान पूर्णपणे वाळण्यापूर्वी पावसात भिजल्यास त्याला ओलावा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे धानाला मोड येणे, दाण्याचा रंग बदलणे तसेच साठवणुकीदरम्यान खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ओलसर धान बाजारात विक्रीसाठी नेल्यास त्याच्या दर्जावर परिणाम होऊन अपेक्षित दर मिळणेही कठीण होऊ शकते. परिणामी, आधीच उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

आधीच संकटे, त्यात अवकाळीची घाव!

यंदाच्या हंगामात पावसाचे अनियमित स्वरूप, पिकांच्या वाढीतील अडथळे आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मोठ्या कष्टाने धानाचे पीक हातात आल्यानंतर आता कापणी आणि मळणीचा टप्पाही पूर्ण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, धान वाळविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांच्या मते, धान उत्पादनासाठी बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी, कापणी आणि मळणी यावर मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत काढणीनंतर धानाचे नुकसान झाल्यास हा संपूर्ण खर्च वसूल करणेही कठीण होणार आहे. विशेष म्हणजे, धानाचे नुकसान झाले तरी त्याची भरपाई मिळण्याची प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ ठरते.

कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घ्यावी

अवकाळी पावसामुळे धानाचे प्रत्यक्ष किती नुकसान झाले आहे, याची कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे पाहणी करावी. आवश्यकतेनुसार पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हातात आलेले धान सुरक्षित राहावे, एवढीच अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ पिकांच्या उभ्या अवस्थेतील नुकसानीकडे न पाहता कापणी आणि मळणीनंतर उघड्यावर ठेवलेल्या धानाच्या नुकसानीचीही दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर कीड-रोगांचे सावट

भंडारा : बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या ‘अक्थ्यान’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबरपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले असून, काही ठिकाणी अधूनमधून तुषारयुक्त पावसाच्या सरी कोसळल्या. या बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. शनिवार, २२ नोव्हेंबरपर्यंत आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार, २३ नोव्हेंबरपासून हवामान हळूहळू स्वच्छ होण्यास सुरुवात होणार असून, सोमवार, २४ नोव्हेंबरनंतर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी आणि पीकवाढीची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक शेतांमध्ये हरभरा, वाटाणा, लाखोरी, सोयाबीन आणि गव्हाची पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यावर आहे. मात्र, सततचे ढगाळ वातावरण आणि हवेतील वाढलेला दमटपणा पिकांसाठी पोषक ठरण्याऐवजी कीड व रोगांचा धोका वाढविणारा ठरत आहे.

हरभरा, वाटाणा आणि सोयाबीन पिकांवर घाटे अळी, पाने खाणारी अळी तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या पिकावर मावा किडीचा धोका निर्माण झाला असून, फुलोऱ्यात असलेल्या तुरीवर फुलगळ आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय फांद्यांवर आलेल्या भाजीपाला पिकांवरही बुरशीजन्य रोगांचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामानातील या अनिश्चित बदलामुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे नियमित निरीक्षण करावे. कीड व रोगांची लक्षणे दिसून आल्यास कृषी विभागाच्या अधिकारी किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन करताना पिकांची अवस्था आणि हवामानाचा विचार करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *