भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व तज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ ते २९ आॅक्टोबर २०२६ या कालावधीत विविध प्रकारच्या तब्बल १०० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या व सुरक्षितपणे पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, दीड महिन्यापेक्षाही कमी कालावधीत १०० शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण करून ग्रामीण रुग्णालय लाखांदूरने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या कालावधीत हायड्रोसील, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, शरीरावरील विविध प्रकारच्या गाठी, गर्भाशयासंबंधित आजार तसेच कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे परिसरातील अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरजही कमी झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्या पुढाकारातून आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाले.
या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ठाकरे, बधिरीकरण तज्ञ डॉ. सुमित मेश्राम, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रोशनी राऊत (ठाकरे), डॉ. तुषार लांजेवार, बालरोग तज्ञ डॉ. अर्चना मेश्राम, डॉ. सर्वेश पवार यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी अधिपरिचारिका श्रीमती गीता गजबे, कु.सुनैना डांगे,अधिपरिचारिका, कु. निकिता बोरकर, अधिपरिचारिका, श्रीमती शालिनी लोणारे,अधिपरिचारिका गजानन मुंडे, अधिपरिचारिका, दीपक नागोसे, रवी मडावी, संकेत सोनेकर, संजय लाडे, भोजराज राऊत, मुन्ना राऊत तसेच हत्तीरोग विभागाचे कर्मचारी मेश्राम यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान आवश्यक सहकार्य करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व संपूर्ण आरोग्य पथक यांच्या समन्वयातून ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर सातत्याने प्रयत्नशील असून, ही कामगिरी रुग्णालयाच्या सेवाभावी कार्याची आणि सामूहिक प्रयत्नांची पावती ठरत आहे.
