
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. सन २०२३ पासून रखडलेले सुमारे १७ लाख रुपयांचे वेतन कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, यामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या ज्येष्ठ कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुमसर नगरपरिषदेत सेवा बजावून निवृत्त झालेल्या काही कर्मचाºयांचे नियुक्तीनंतरचे थकीत वेतन तांत्रिक कारणांमुळे प्रशासकीय स्तरावर अडकले होते. अनेक वेळा पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नसल्याने ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाºयांमध्ये नाराजीचा सूर होता. ही बाब कर्मचाºयांनी नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांच्या निदर्शनास आणून दिली.नगराध्यक्षांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. केवळ सूचना न देता, १५ दिवसांच्या मर्यादेत ही रक्कम संबंधित कर्मचाºयांच्या बँक खात्यात जमा होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने गतीने हालचाली करून १७ लाख रुपयांचा निधी कर्मचाºयांना वितरित केला.