भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : मडेघाट फाटा ते पुयार या सुमारे ७ किलोमीटर रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था आणि प्रशासनाकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाच्या निषेधार्थ पुयार , कन्हाळगाव, आणि मडेघाट येथील नागरिकांच्या वतीने मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता मडेघाट फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मडेघाट फाटा ते पुयार या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासावरही परिणाम होत असल्याचे युवक काँग्रेसने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी करत ५ मे २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मागणीवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने पुयार , कन्हाळगाव, आणि मडेघाट येथील नागरिकांनी व युवक काँग्रेसने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मडेघाट, कन्हाळगाव आणि पुयार परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून प्रशासनाने रस्त्याच्या प्रश्नाकडे गांभीयार्ने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. करीता रास्ता रोको आंदोलनात परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश- ासन या रस्त्याच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.