भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : गोंदिया महामार्गावरील गंगाझरी बसस्थानकाजवळ गतिरोधका जवळ मोटार सायकलवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन युवकांना मागून आलेल्या भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील धापेवाडा जवळील लोधीटोला येथील सौरभ जयसिंग बघेले (२०), गौरव गणेश बैठवाड (२०) आणि निखिल सुखदेव मेश्राम (१९) हे तिघे मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एव्ही ६४३५ वरून जात होते.
गंगाझरी बसस्थानकाजवळ गतिरोधकाच्या ठिकाणी त्यांच्या मोटारसायकलला बोलेरो क्रमांक एमएच ३५ बीसी ४२६३ च्या चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेले बोलेरो वाहन ताब्यात घेतले. मृतांच्या मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी केटीएस रुग्णालय, गोंदिया येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी हेमंत उर्फ बबलू बघेले यांच्या तक्रारीवरून बोलेरो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगाझरी पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक अजित धाराव करीत आहेत.