
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : तालुक्यातील कालिमाती येथे विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तणसाच्या ढिगाºयाला आग लागून १० हेक्टर क्षेत्रातील तणस जळून खाक झाली. ही घटना ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी रामभाऊ तुळशीराम ब्राह्मणकार, केशोराव हिरामन ब्राह्मणकार तसेच ईश्वर हिरामन ब्राह्मणकार यांच्या अंदाजे १० हेक्टर परिसरातील तणस जळाली असून या सर्व शेतकºयांचे मोठे नुकसान झाल आहे. तर जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्याचवेळी वीजतारा एकमेकांना स्पर्श झाल्यानेमोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत त्यातून तणसाच्या ढिगांवर ठिणगी पडली. क्षणातच तणसाच्या ढिगारा आगीच्या स्वाधिन झाला.
आग लागल्याचे कळताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले. घटनेची माहिती गोरेगाव येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तास अथक प्रयत्नकरून आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेत तणसाचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे पशुधनासाठी आवश्यक असलेला चारा नष्ट झाल्याने शेतकरी कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून गावातील जुन्या व सैल झालेल्या वीजतारा तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच कृषी विभाग व महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.