
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाºया पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात तुमसरभंडारा मार्गावरील मोहगाव (देवी) गावाजवळ शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिगंबर तुरकर असे मृताचे नाव दिगंबर तेजलाल तुरकर (२९, रा. डोंगरगाव, ता. जि. गोंदिया) असे मृत युवकाचे नाव आहे. दिगंबर हा नागपूर येथील एका रिअल इस्टेट कंपनीत कार्यरत होता. शनिवारी तो आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३१ 31 ॠइ ५३७३) कामाच्या निमित्ताने तुमसरकडून नागपूरकडे जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोहगाव (देवी) गावाजवळ दिगंबरने समोर जात असलेल्या एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी समोरून येणाºया भरधाव पिकअप वाहनाची आणि त्याच्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जोरात होती की दिगंबर रस्त्यावर फेकला गेला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता, हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. अपघातानंतर तुमसर-भंडारा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अपघाताची माहिती मिळताच दिगंबरच्या नातेवाईकांनी वरठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या घरातील तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्याचे पाहून नातेवाईकांनी केलेला विलाप हृदय पिळवटून टाकणारा होता.