सिहोरा येथे पाण्याचा ठणठणात

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : येथून ९ किलोमीटर अंतरावर व वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या कवलेवाडा डॅम्प लगत पिपरी चुनी येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आज सिहोरा ग्रामवासियांसाठी पांढरा हत्ती ठरली आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. ग्रामवासियांची ओरड व पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता ग्रामपंचायत सिहोराचे सरपंच सलाम शेख यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिहोरा गावासाठी सन १९७६ ला सिंदपूरी येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची अवस्था जीर्ण होत चालली आहे. ती योजना सिंदपुरी नाल्यावर उभारण्यात आल्यामुळे पाहिजे तेवढा पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. नाला कोरडा पडल्यामुळे नाल्याला वाळवंटाचे स्वरूप आले आहे.

आतापासूनच सिहोरा गावात पाण्याची तीव्रता भासू लागली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामवासियांच्या मनात प्रशासनाच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. सध्या सिहोरा गावाची लोकसंख्या १० हजाराचे वर आहे. सिहोरा गावाची वाढती लोकसंख्या व दरवर्षी भासणारी पाण्याची तीव्रता लक्षात घेता पिपरी येथील वैनगंगेच्या तीरावर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयाची योजना उभारण्यात आली आहे. पाईपलाईनचे काम पिपरी ते सिहोरा पर्यंत पूर्ण झाले आहे. याच पिपरी गावावरुन तुमसर शहराला पाण्याचा पुरवठा होत आहे तेव्हा सिहोरा गावाला कां नाही? असा प्रश्न सिहोरा वासियांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने पाण्याची टंचाई लक्षात घेता जल जीवन मिशन योजने अंतर्गत पिपरी चुन्नी येथे उभारण्यात आलेली पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करण्यात यावी अन्यथा प्रशासन व संबंधित विभागाच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असा खरमरीत इशारा ग्रामपंचायत सिहोराचे सरपंच सलाम भाई शेख व ग्रामवासियांनी दिला आहे. सदर प्रतिनिधीने संबंधित विभागाशी संपर्क साधला असता कंत्राटदाराला केलेल्या कामाचे बिल मिळाले नाहीत. अपुरे कामे पूर्ण केल्यावरही बिल मिळण्याची हमी नसल्यामुळे कंत्राटदाराने कामे थांबवल्याची माहिती मिळाली आहे. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे सांगीतले जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *