अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल; अकरा महिन्यांच्या बालकाला सोडून महिला बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत; तुमसर पोलिसांकडून तपास सुरू
भंडारा पत्रिका/वार्ताहर
गर्रा-बघेडा : तुमसर शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने महिलेला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तुमसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकिता राजकुमार बोपचे (वय २२, रा. पारसोडी, ता. लाखनी, जि. भंडारा) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. तिचे लग्न सन २०२४ मध्ये राजकुमार किशन बोपचे यांच्याशी झाले असून, तिला ११ महिन्यांचा मुलगाही आहे.
दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास निकिता तुमसर येथील नवीन बसस्थानक परिसरात आली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदार सचिन रामदास राहांगडाले यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अपराध क्रमांक ११३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
