पाच जण ताब्यात, चार फरार | डोडमाझरी येथे कारवाई
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : भंडारा तालुक्यातील डोडमाझरी येथे पैशांची हार-जीत लावून ५२ तासपत्त्यांवर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारधा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळावरून दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम आणि तासपत्ते असा एकूण ५४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांना डोडमाझरी येथे पैशांची हार-जीत लावून तासपत्त्यांवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले, तर अन्य चार जण फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५० रुपये किंमतीचे ५२ तासपत्ते, ३० हजार रुपये किंमतीची हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी (क्रमांक एमएच ३६-०३९२४), जुगाराच्या फडावरील १ हजार १० रुपये रोख, एका आरोपीकडून २०० रुपये रोख व १० हजार रुपये किंमतीचा व्हिवो मोबाईल, तसेच अन्य एका आरोपीकडून ८०० रुपये रोख व १२ हजार रुपये किंमतीचा व्हिवो मोबाईल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५४ हजार ६० रुपये असल्याचे नमूद केले.
या प्रकरणात विशाल टिकाराम भोयर (वय ३०), संघदीप राजकुमार रहाटे (वय ३८), विक्की मनोहर शिंगाडे (वय ३२), आशिष राजू रहाटे (वय २९) आणि संजय देवराम फुलसुंगे (वय ४५), सर्व रा. डोडमाझरी, ता. जि. भंडारा, यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तर सुरेश यादवराव राऊत (अंदाजे वय ५५), रुपेश अशोक वासनिक (अंदाजे वय ३३), सुदेश मार्कंड खांडेकर (अंदाजे वय ४०) आणि विक्की देवदास बंसोड (अंदाजे वय २८), सर्व रा. डोडमाझरी, हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इंगळे, पोलीस हवालदार शहारे व कारधा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.