गोंदियातील बोदलकसा जलाशय फुटला

१० ते १२ गावाना पुराचा धोका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

तिरोडा/गोंदिया : महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बोदलकसा जलाशय फुटल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, परिसरातील जवळपास १० ते १२ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याने कॅनॉल चे पाणी बंद करून दुसरी कडे वळविण्यात आले आहे. तरी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर येथील एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. जलाशय फुटल्याने वाहणारे पाणी अडवण्यासाठी सकाळपासून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी मदार पत्की व स्थानिक आमदार विजय रहांगडाले हे ही स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन बाधित गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाला आज दिनांक १२ रोजी पहाटे ५.३० चे दरम्यान मोठे भगदड पडल्याची लक्षात येताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

माहिती कळताच जिल्हाधिकारी मदार पत्की, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार एन.एम. ठाकडे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांचे सह पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सोनाली चोपडे, सर्कल इंजिनियर राजेश पाटील, कार्यकारी अभियंता राजीय कुथेकर, उप अभियंता सी.बी. डोंगरे ,धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत मकावार यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी येथे पोहोचून जलाशयाला पडलेले भगदड बुजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात अपयश आले.

पाण्याच्या वेगाने होणारा मोठा विसर्ग पाहून हे पाणी नागरी वस्तीत शिरू नये याकरिता परिसरातील नाल्यात सोडण्यात आल्याने रुस्तमपूर, बुचाटोला, खमारी, चिखली, गरडा, लोधीटोला, घादरी, उमरी, भांबोंड इत्यादी गाव परिसरातील शेतात जाऊन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे सर्वत्र सूचना देऊन नागरिकांना सजग करण्यात आले.

तसेच नाल्याचे काठावर असलेले पाण्याचे पंप काढून घ्यावे व नाल्याच्या काठावर बांधण्यात आलेले गाईडोरे व जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी तिथून निघून जावे अशा सूचना देण्यात आली. आकस्मिक परिस्थिती लक्षात घेत तातडीने बचाव कार्यवाहीकरिता गोंदिया सह नागपूर येथील एन डी आर एफ टोमचे जवळपास १०० जवान तैनात करण्यात आले.

जलाशयाला भगदड पडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याची माहिती पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनींनी येथे गर्दी केली. गर्दी नियंत्रण पर आणण्याकरिता तिरोडा पोलिसांचे मदतीने गोंदिया पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

जलाशयाला एवढे मोठे भगदड कसे पडले : बोपचे

बोदलकसा जलाशयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असताना जलाशयाला एवढे मोठे भगदड कसे पडले, असा सवाल राकाँ श.प.पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांनी उपस्थित केला है. हे भगदड अचानक पडले नसून, सुरुवातीला लहान छिद्र निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने वेळेच दुरुस्ती न केल्याने तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे पावसाभावी शेतकरी संकटात असताना दुसरीकडे बोदलकसा जलाशयातील पाण्यासाठा वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असल्याचे सांगत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करत असताना जलाशयातील पाणी वाया जाण्याची शक्यता ही चिंतेची बाब असल्याचे बोपचे यांनी म्हटले आहे. जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यास त्याचा परिणाम केवळ चालू खरीप हंगामावर नव्हे, तर आगामी रब्बी हंगामातील सिंचनावरही होऊ शकतो. या परिसरातील शेतीला रब्बी हंगामात पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे जलाशयातील पाणी वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मागणी बोपचे यांनी केली आहे.

भगदड बुजविण्याचे प्रयत्न सुरू!

बोदलकसा जलाशय ९५ टक्के भरलेला होता. मात्र, अचानक भगदड पडल्याने पाणीसाठ्याच्या सुरक्षतेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुजविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी उत्खनन करायचे लागत असून काही झाडेही तोडण्यात आली आहेत. मात्र, भगदड मोठे असल्याने ते बुजविण्यास मोठी अडचण होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांना सक्रिय करण्यात आले असून, संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असल्याचेही कुटेकर यांनी स्पष्ट केले.

जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने भगदडातून पाणी बाहेर पडत राहिल्यास संपूर्ण जलसाठा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भगदड बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विभागाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

— राजीव कुटेकर

कार्यकारी अभियंता

पाटबंधारे विभाग गोंदिया

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *