■ बॅरिकेड्स उडवत मजुराला चिरडले ■ ३८ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू ■ बाम्हणी/ख. येथील घटना
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- कष्ट करून आपल्या कुटुंबाचा संसार चालविण्यासाठी महामार्गाच्या कामावर घाम गाळणाऱ्या एका मजुराचा भरधाव ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी/ख. येथे घडली. महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स उडवत भरधाव आयशर ट्रक थेट मजुराच्या अंगावर गेल्याने तो जागीच चिरडला गेला. डुंडेश्वर धनलाल चुटे (वय ३८, रा. बाम्हणी/ख.) असे मृत मजुराचे नाव आहे. या दुर्घटनेत एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपला असून दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा बाम्हणी/ख. येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान घडली. डुंडेश्वर चुटे हे आर.आर.एम. कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे आपल्या कामावर हजर होते. रस्त्याच्या मध्यभागी वाढलेले गवत आणि काटेरी झुडपे कापण्याचे काम ते करीत होते. कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
मात्र, याचदरम्यान कोह्माराकडून देवरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा आयशर ट्रक क्रमांक जेएच ०२ बीडब्ल्यू ५९११ कामाच्या ठिकाणी आला. ट्रकच्या वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याने कामाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स जोरदार धडकेत उडवून दिले. त्यानंतर ट्रक थेट काम करणाऱ्या डुंडेश्वर चुटे यांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात ते ट्रकखाली पूर्णपणे चिरडले गेले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणात घडलेल्या या घटनेने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला. घटनेमुळे बाम्हणी/ख. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातासंदर्भात डुग्गीपार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महामार्गावरील मजुरांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर
राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना अनेकदा भरधाव वाहनांच्या धोक्याचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले असतानाही वाहनाने ते उडवत थेट मजुराला चिरडण्याची ही घटना महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा साधने, स्पष्ट सूचना फलक, वाहतुकीचे नियंत्रण आणि वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटनांमध्ये निष्पाप मजुरांना आपला जीव गमवावा लागण्याची भीती कायम राहणार आहे. एका भरधाव ट्रकने केवळ एका मजुराचा जीव घेतला नाही, तर दोन मुलांचे पितृछत्र आणि एका कुटुंबाचा जगण्याचा आधारही हिरावून घेतला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दोन मुलांचा आधार हरपला, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
डुंडेश्वर चुटे हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज मेहनत करीत होते. मजुरी करून मिळणाऱ्या पैशातून पत्नी आणि दोन मुलांच्या भविष्याची स्वप्ने त्यांनी पाहिली होती. मात्र, काळाने अचानक घाला घातल्याने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा आधारच हिरावून घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. वडिलांच्या अकाली निधनामुळे दोन मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले असून पत्नीसमोर संसाराचा गाडा पुढे कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या घटनेने चुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
