आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात !
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीतील चिखाली येथे पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रामकला जागेश्वर शिवणकर (वय ४१) असे मृत महिलेचे नाव असून, जागेश्वर आसाराम शिवणकर (वय ४६) असे आरोपी पतीचे नाव आहे। पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे। याच वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचा प्राथमिक संशय आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला।
सकाळच्या सुमारास महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मृत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा असून हाताच्या बोटांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे। बोटांवरील जखमा पाहता हल्ल्या दरम्यान महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। रात्रीच्या वेळी पती-पत्नीमध्ये झालेल्या वादामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले।
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली। तसेच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, घटना स्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यात येत आहेत। या प्रकरणातील आरोपी पती जागेश्वर शिवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पत्नीच्या हत्येमागील नेमके कारण काय, रात्रीच्या वादातूनच ही घटना घडली का आणि हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या कुऱ्हाडीबाबत अधिक तपास सुरू आहे। या घटनेने चिखाली गावात शोककळा पसरली असून, डुग्गीपार पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत।
