अवैध रेती वाहतुकीवर एलसीबी ची कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

पालांदूर : पोलीस ठाणे हद्दीतील मौजा तई (बुज.) येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा उपविभाग साकोली पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत विना क्रमांकाचा स्वराज ट्रॅक्टर व १ ब्रास रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।

२३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. यावेळी लोकेश गजानन फुंडे (वय २६, रा. तई बुज.) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे पालांदूर येथे अपराध क्र. २९८/२०२६ अन्वये कलम ३०५ (इ) भान्यास नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।

या सर्व प्रकारच्या रेती तस्करीतील कारवाई संबंधातील विशेष आणि विचार करायला लावणारी बाब म्हणजे, घटनास्थळ्यापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर पालांदूर पोलीस ठाणे असताना, ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथकाला सुमारे ५० किलोमीटर दूरून या दुर्गम भागात यावे लागले।

वारंवार कारवाया होऊन देखील या भागात रेती उत्खनन व वाहतूक सर्रास सुरू आहे. स्थानिक पातळीवर यावर अंकुश का लागत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होत आहे।

स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज होणारी अवैध वाहतूक स्थानिक पातळीवरच थांबणे अपेक्षित असताना, त्यासाठी जिल्ह्याच्या पथकाला यावे लागते, यावरून स्थानिक यंत्रणा किती सक्षम आहे, याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, या पोलीस ठाणे हद्दीतील भुगाव, डोंगरगाव, पळसगाव, तई, मऱ्हेगाव, वाकल या सर्व रेती घाटांवर कायमस्वरूपी नाकाबंदी करून अवैध उत्खनन व वाहतूक कायमची थांबवावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह नागरिकांकडून होत आहे।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *