प्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी भंडारा पोलिसांचा पुढाकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, निरोगी आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, तसेच त्यांना विविध कायदेविषयक बाबींची माहिती मिळावी, या उद्देशाने भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने प्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। वरठी रोड, भंडारा येथील दादाजी वृद्धाश्रमातील सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला १५० ते २०० ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।

भंडारा पोलीस विभाग, समाजकल्याण आयुक्तालय (महाराष्ट्र शासन) आणि जनसेवा फाउंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भंडाराचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षा, फसवणूक प्रतिबंध, वाहतूक नियमांचे पालन, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि महिला सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले।

कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित योग शिक्षिका अंजली मोरे यांनी वाढत्या वयानुसार करावयाची आसने, व्यायाम आणि सूक्ष्म व्यायाम याविषयी सविस्तर माहिती दिली। शरीरासोबतच मनाचे आरोग्य जपून आनंदी जीवन कसे जगावे, तसेच योग्य वेळी योग्य आहार घेण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले। त्यानंतर भंडारा येथील आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटरच्या डॉ. साक्षी सोनकुसरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करून उपयुक्त सल्ला दिला।

सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सायबर पोलीस स्टेशन भंडाराचे स.पो.नि. नीरज साबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे स्वरूप आणि ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या विविध पद्धती समजावून सांगितल्या। अनोळखी व्यक्तीकडून येणारे फोन, संशयास्पद येणाऱ्या अ‍ॅड फाइल्स किंवा लिंक उघडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले। फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले।

जनसेवा फाउंडेशन, पुणेचे कार्यक्रम अधिकारी जयवंत मंत्री यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायदेविषयक तरतुदींबाबत मार्गदर्शन केले। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा, वृद्धापकाळात घरातील ज्येष्ठांना आवश्यक ती मदत करावी आणि स्वतःला नेहमी चांगल्या व सकारात्मक कामांमध्ये व्यस्त ठेवावे, असे आवाहन केले। तसेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनीष बेरसुरे (B.A.M.S., M.D.A.M.), राष्ट्रीय हेल्पलाइन १४५६७ चे महाराष्ट्र राज्य फील्ड रिस्पॉन्स लीडर राजेंद्र आहेर आणि वर्धा येथील आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराचे हशाम शेख उपस्थित होते।

कार्यशाळेला भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ व फेसकॉम (भंडारा) चे पदाधिकारी आणि सदस्य, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस हवालदार योगिनी नाकतोडे यांनी केले, तर भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका गोदमले यांनी उपस्थितांचे आभार मानले। ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या आरोग्याची आणि कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणारी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *