भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोदिया : गोरेगाव येथील गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा कार्यालयात मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे बँकेसह लगतच्या दुकाने व घरांचे संभाव्य मोठे नुकसान टळले. या घटनेत बँकेतील बॅटरी, इन्व्हर्टर व सर्किट रूम मधील इतर साहित्य जळून खाक झाले.
वाहतूक पोलीस हवालदार हासिल भांडारकर व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार रमेश सेलोकर हे रात्री गस्तीवर असताना त्यांना बँकेच्या कार्यालयातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना जागे करून घटनेची माहिती दिली. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. नवरात्रोत्सवामुळे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार कार्यालयाचे मागील शटर उघडून पाहणी केली असता सर्किट रूममध्ये आग लागल्याचे दिसून आले. परिसरात धुराचे लोट पसरले होते, तर बँकेतील बॅटरी व इन्व्हर्टर आगीत जळून खाक झाले होते. त्यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
घटनेची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली दाले यांना देण्यात आली. दरम्यान, विभागीय गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक व्यंकट पोटे आणि ११२ पथकानेही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. वाहतूक पोलीस हवालदार हासिल भांडारकर आणि त्यांचे सहकरी रमेश सेलोकर यांच्या सतर्कता व कर्तव्यदक्षतेमुळे मोठे अनर्थ टळल्याने पोलीस निरीक्षक वैशाली दाले यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
लगतच्या दुकानांचे नुकसान टळले…
सहयोग बँक राष्ट्रीय महामार्गालगत असून, बँकेच्या खालच्या भागात कापडाचे दुकान आहे. तसेच परिसरात इतर दुकाने आणि घरेही आहेत. आग वेळेчच लक्षात आली नसती, तर ती लगतच्या दुकानांपर्यंत व घरांपर्यंत पसरण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी तत्परतेने हालचाली केल्याने संभाव्य मोठे नुकसान टळले. पोलिसांच्या या सतर्कतेबद्दल परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.