केक-भेटवस्तू नको, तर शेतकरी कुटुंबांसाठी निधी द्या!

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे आवाहन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : वाढदिवसानिमित्त केक, पुष्पगुच्छ आणि महागड्या भेटवस्तू देण्याची परंपरा बाजूला सारत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श व सामाजिक संदेश दिला आहे. वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सहायता निधी जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळते. कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या दुःखात सहभागी होत त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून तो निधी गरजूंना दिल्यास संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी यामागची भावना आहे.

सध्याच्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, खा. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात व महायुतीच्या सर्व आमदारांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीतर्फे ‘आत्महत्याग्रस्त शेतकरी सहायता निधी पेटी’ ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी सदळ हाताने या निधीत दान करून सहकार्य करावे, असे आवाहन सुनील फुंडे यांनी १९ ऑक्टोबर रोजी केले.

यावेळी आ. परिणय फुके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, अभिजित वंजारी, बंडू भुरे, डॉ. श्रीकांत वैरागडे, नगरसेवक रूबी चड्डा, हेमंत महाकाळकर, स्वप्नील नशिने, योगेशेडाऊ, राजेश मदान यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, सर्व माध्यमाचे पत्रकार व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. वैयक्तिक आनंदापेक्षा सामाजिक जाणीव आणि माणुसकीला प्राधान्य देणारा हा उपक्रम समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *