भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : तालुक्यातील बोंडराणी परिसरात घडलेल्या वर्षा तुरकर हत्याकांडाने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचा पोलिसांनी शिताफीने तपास करून हत्येचा उलगडा केला। या प्रकरणात वर्षा तुरकर हिचा प्रियकर नितेश याची पत्नी मोना नितेश अग्रवाल हिने तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले। या कटात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती।
या प्रकरणात मोना नितेश अग्रवाल, इम्रान करीम शेख, शाहरुख खान फिरोज खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि एका अल्पवयीन आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। आरोपींकडून सुपारीच्या १३ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये, हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आणि मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे।
यापूर्वी आरोपींना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज, २४ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना तिरोडा न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने सुपारी देणारी मोना नितेश अग्रवाल हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर उर्वरित चार आरोपींकडून हत्येसंदर्भातील अन्य साहित्य जप्त करणे बाकी असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली।
या हत्याकांडातील आणखी पुरावे आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने करीत आहेत।
