घरफोडीचा पर्दाफाश; ट्रॅक्टरची बॅटरी चोरटे ताब्यात !

 ■ भंडारा पोलिसांची मध्यरात्री कारवाई ■ डायल ११२ वरील एका फोनने घरफोडीचा उलगडा ■ पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांना पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भंडारा पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. डायल ११२ वर मिळालेल्या माहितीच्या आधारे घरफोडीचा छडा लावत दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत रस्त्यावरील ट्रॅक्टरची बॅटरी चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या दोन घटनांचा उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भंडारा शहरातील गुजराती कॉलनी परिसरात राहणारे फिर्यादी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून कपाटातील मौल्यवान वस्तू व अंदाजे चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली. दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या पुतणीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून घरात चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच फिर्यादीच्या नातेवाईकांनी विलंब न करता डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

डायल ११२ वर कॉल प्राप्त होताच भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची पाहणी केली असता घराच्या आतमध्ये घरफोडी करणारे नावेद शहा अब्बास शहा वय २६ वर्षे व अस्लम शरीफ खान वय २३ वर्षे रा. यशोधरा नगर नागपूर हे मिळून आले. सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नागपूर जिल्ह्यात चोरी, घरफोडीचे गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन्ही प्रकरणांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात वरील दोन्ही घटनांप्रकरणी आरोपीविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून चारही आरोपी भंडारा पोलिसांच्या ताब्यात आहेत.

रस्त्यावरील ट्रॅक्टरची बॅटरी चोरणारे दोघे जेरबंद

दुसऱ्या घटनेत २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री भंडारा शहरात पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत होते. मध्यरात्री अंदाजे २.३० वाजताच्या सुमारास दोन इसम संशयास्पदरित्या होंडा अ‍ॅक्टिवावरून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांच्या मोपेडच्या पायदानावर ट्रॅक्टरची बॅटरी आढळून आली. पोलिसांनी तातडीने चौकशी करून बॅटरीबाबत माहिती घेतली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. जवळच राहणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालकाचा शोध घेऊन पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर ट्रॅक्टर मालक मधुकर मिताश्वर धुर्वे यांना बोलावून बॅटरीची ओळख पटविण्यात आली. ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरी गेलेल्या बॅटरीची किंमत अंदाजे ६ हजार २०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महेश पुरुषोत्तम नंदनवार (वय ४२, रा. लाल लजपतराय वॉर्ड, भंडारा) आणि पवन नरेंद्र नगरारे (वय ४०, रा. लालबहादूर शास्त्री वॉर्ड, भंडारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

या दोन्ही घटनांमधून नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांची तत्परता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. परिसरात रात्रीच्या वेळी अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. घरफोडी, चोरी अथवा चोरीचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आल्यास डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच घरासमोरील वाहने, ट्रॅक्टर व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठेवावे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी. नागरिकांच्या सहकार्यानेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात भंडारा ठाणेदार उल्हास भुसारी, सपोनि. सुनिल सोनवाने, रापोनि. खंडाडे, पोउपनि. रोशन ओकटे, सफौ. रोशन गर्गाळे, पोलीस अमलदार स्वप्नील गुल्हाने, लोकेश यासनिक, अंकुश पराग, संदीप बंबावले, रोशन माटे, राजेंद्र लांबट, ललि

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *