गोंदिया-मुंबई वंदे भारत सुरु करण्याची मागणी!

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत खा. पटेल यांची चर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : गोंदिया व भंडारा जिल्ह्यांसह परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांनीही रेल्वेच्या समस्या, नवीन सुविधा आणि प्रवाशांच्या गरजा संदर्भातील महत्त्वाची निवेदने रेल्वेमंत्र्यांना सादर केली.

या भेटीदरम्यान गोंदिया-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. तसेच इंटरसिटी एक्सप्रेसला सालेकसा रेल्वे स्थानकावर थांबा देणे आणि गोंदिया येथे रेल्वे गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी (मेंटेनन्स) आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

भंडारा, तुमसर, तिरोडा, आमगाव आणि सालेकसा या रेल्वे स्थानकांवर आवश्यक गाड्यांना थांबा देण्याचा मुद्दाही रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. या स्थानकांवर रेल्वे थांबे उपलब्ध झाल्यास स्थानिक प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी तसेच नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका मांडण्यात आली.

रेल्वे मार्ग आणि इतर रेल्वे प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. रेल्वे प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या शेतकरी आणि जमीन मालकांना योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

तिरोडा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्याबाबतही रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. या योजनेत स्थानकाचा समावेश झाल्यास स्थानकावरील पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधांच्या विकासाला चालना मिळू शकते.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन रेल्वे सेवा, गाड्यांचे थांबे, देखभाल-दुरुस्ती सुविधा आणि स्थानकांचा विकास या विषयांवर रेल्वे मंत्रालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी या भेटीतून करण्यात आली. या मागण्यांवर पुढील कार्यवाहीकडे आता परिसरातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *