गोंदियात भेसळयुक्त मिठाई व दुग्धजन्य पदार्थांवर धडक कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोंदिया :- सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात गोंदिया जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शहरातील कुडवा येथील लोहिया वॉर्डातील ‘रिफा दूध डेअरी’ वर १३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीने धडक तपासणी केली. या कारवाईत हजारो किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच ७० घरगुती गॅस सिलिंडरही जप्त करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तपासणी दरम्यान डेअरीमध्ये पनीर, खवा, कुंदा, रसगुल्ले आणि पेढे तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असच्छता व कचरा आढळून आला. कोल्ड स्टोरेजच्या भिंतींवर काळी आणि हिरवी बुरशी साचली होती. दुर्गंधीयुक्त वातावरणात दुग्धजन्य पदार्थ साठवण्यात आले होते. रसगुल्ल्यांच्या उघड्या डब्यात मृत कीडे आणि माश्या आढळल्याने अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तर डेअरीमध्ये दुधाच्या खरेदी-विक्रीच्या अधिकृत पावत्या किंवा नोंदी उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले. तसेच शासनमान्य प्रमाणित नसलेले वजनकाटे वापरले जात असल्याचे आढळले. वैधमापन शास्त्र विभागाने संबंधित वजनकाटे जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

७० घरगुती गॅस सिलिंडर जप्त

व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचेही उघड झाले. पुरवठा विभागाने ७० सिलिंडर जप्त केले असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हजारो किलो माल नष्ट

जप्त केलेले दुग्धजन्य पदार्थ पिकअप वाहनातून शहराबाहेरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे जेसीबीच्या साहाय्याने खोल खड्डा खोदून हा माल पुरून नष्ट करण्यात आला.

या कारवाईत दुग्धशाळा व्यवस्थापक प्रशांत बोरसे, सहाय्यक आयुक्त अमृता शिर्के, अन्नसुरक्षा अधिकारी चेतन नानोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *