पचखेडी येथे रंगोली, लिंबू, बांगड्या व मूर्ती ठेवून पूजा
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : जिल्ह्यात भानमतीसारख्या प्रकारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. साकोली तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायती नंतर साणगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात आणि आता भंडारा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील पचखेडी (दवडीपार) गावात असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, अशा प्रकारांना घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पचखेडी येथे रंगोळ्या काढून त्यावर लिंबाला काळे टोचून ठेवण्यात आले होते. तसेच बांगड्या व मूर्ती ठेवून गुलाल-बुक्का टाकत पूजा केल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे गावात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील किशोर शेंडे यांनी कारधा पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच या प्रकाराचा शोध घेण्यासाठी श्वानपथकही बोलावण्यात आले. पोलिसांनी घटना स्थळावरील साहित्य बाजूला केले.
दरम्यान, काही नागरिकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे आणि वेंकटराव गायधने यांनी गावाला भेट दिली. मात्र, ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत पोलिसांनी तेथील साहित्य बाजूला केले होते.
भीतीपोटी अंधश्रद्धेला बळी पडू नये : विष्णुदास लोणारे
जिल्ह्यात यापूर्वी झाडगाव ग्रामपंचायत परिसरात रांगोळीवर बांगड्या व लिंबू ठेवून अगरबत्ती लावून पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर साणगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणातही अशाच प्रकारची घटना घडली होती. आता पचखेडी येथे तिसऱ्यांदा अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. अशा घटना घडवून काही व्यक्ती समाजात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास स्वतःहून निष्कर्षक न काढता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे युवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी केले आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि अंधश्रद्धेमुळे निर्माण होणारी भीती दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून अशा घटनांकडे विवेकनिष्ठ दृष्टिकोनातून पाहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.