भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ (Viksit Bharat Young Leaders Dialogue) ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनंदा बजाज, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, भंडारा, ह्या उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजेश तलमले, राज्य युवा पुरस्कारार्थी, श्यामकुमार चरडे, मुख्याध्यापक, प्रगती महाविद्यालय, भंडारा येथील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी युवा महोत्सव आयोजना मागील उद्देश व महत्त्व विशद केले.
उद्घाटनपर मार्गदर्शन करतानी शैलजा वाघ, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा यांनी युवक-युवतींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलाविष्कारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच कला, संस्कृती व सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, हा युवा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. युवक हे देशाचे आधारस्तंभ असून राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी शिक्षणासोबतच रोजगार, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सदर युवा महोत्सवामध्ये समूह लोकगीत, समूह लोकनृत्य, पथनाट्य, कवितालेखन, चित्रकला या कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेकरिता पंच म्हणून ममता राऊत, पुजा काटेखाये, राहुल हुमणे, विक्रम फडके, स्नेहल खानापूरकर, शुभांगी खोब्रागडे, सारिका दोनौडे, मोनिका हुमणे, चेतना राव, स्नेहा तिडके, हेमंत पटले, रोहीत वाघ यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरिता समूह लोकगीत – गांधी विद्यालय पोहेरा प्रथम, समूह लोकनृत्य गांधी विद्यालय कोंढा प्रथम, पथनाट्य प्रगती महाविद्यालय, भंडारा प्रथम, कविता ओम श्रावण फुंडे – प्रथम, चित्रकला – सृष्टी देवचंद बुधरी प्रथम, प्रणाली खुशाल नामपुरे – प्रथम यांची निवड झाली असून विजयी संघ / कलाकारांना जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, यांनी शुभेच्छा दिल्या. युवा महोत्सवाचे संचालन रोहीत वाघ, तर आभार प्रदर्शन अविनाश निंबाळें, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आकाश गायकवाड, क्री.अ., निखिलेश तभाने, क्री.अ. पराग गावंडे, क्री.मा., प्रतिक लाडे, क्री.मा., प्रविण देसाई, राजेंद्र सावरबांधे, सुरज लेंडे, सुधीर गळगळे, अतुल गजभिये, यांनी विशेष परिश्रम घेतले.
