पालांदूर येथील बाजार चौकात मृत्यूची वाहतूक !विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा बिनधास्त धुमाकूळ; प्रशासन मात्र डोळे झाकून बसलंय!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर : प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रोज सकाळ-संध्याकाळ माती या गौण खनिजाची खुलेआम लूट सुरू आहे. पालांदूरच्या गजबजलेल्या बाजार चौकातून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली भरधाव वेगाने धावते. ना नंबर, ना परवाना, ना भीती… फक्त प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचे दिसून येते.

पालांदूरचा बाजार चौक म्हणजे गावाची जीवघेणी नाळ. शाळकरी मुलं, महिला, वृद्ध, भाजी विक्रेते, दुकानदार – हजारो लोकांची दररोज याच चौकातून ये-जा असते. अशा रहदारीच्या ठिकाणाहून मातीने भरलेली अवजड ट्रॉली भरधाव नेली जाते. एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण? ट्रॅक्टरचा नंबर नाही, मग शोधणार कोणाला? हा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे.

दिवसा ढवळ्या चालतोय अवैध धंदा

ही वाहतूक रात्रीच्या अंधारात नाही, तर उजेडात, सर्वांसमोर, दररोज सकाळी आणि सायंकाळी सुरू आहे. म्हणजे प्रशासनाला दिसत नाही असं नाही, प्रशासनाला दिसायचंच नाहीये! महसूल विभाग, पोलीस विभाग, खनिकर्म विभाग – सगळे या विना क्रमांकाच्या गाड्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.

माती हे गौण खनिज आहे. त्याच्या उत्खननाला आणि वाहतुकीला शासनाचा परवाना, रॉयल्टी पावती लागत असते. पण इथे तर गाडीलाच नंबर नाही, मग परवाना कसा असणार? हो तर उघड उघड शासनाच्या महसुलाची लूट आहे.

प्रशासनाचा बेजबाबदारपणा जीवघेणा ठरणार का?

बाजार चौकातून भरधाव जाणारी ही ट्रॉली एखाद्या दिवशी एखाद्याच्या जीवावर बेतली तर? एखाद्या शाळकरी मुलाला चिरडले तर? तेव्हा प्रशासन जागे होणार का? की मग फक्त पंचनामा करून कागदोपत्री कारवाईचा फार्स करणार?

नागरिकांचा संतप्त सवाल

विना क्रमांकाची वाहने बाजार चौकातून कशी धावतात?, माती वाहतुकीला परवाना आहे का?, रॉयल्टी भरली जाते का?, सकाळ-संध्याकाळ वाहतूक लीस चौकात असताना ही वाहतूक का रोखली जात नाही?, या अवैध वाहतुकीमागे कुणाचे आशीर्वाद आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

आता तरी कारवाई करणार का?

पालांदूरकर आता गप्प बसणार नाहीत. या बिनधास्त आणि बेकायदेशीर वाहतुकीवर तात्काळ कारवाई करून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करावेत, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि बाजार चौकातील ही मृत्यूची वाहतूक कायमची थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाने आता तरी डोळे उघडले नाहीत, तर पुढील अपघाताला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा नागरिक देत आहेत.

आता जिल्हाधिकारी, भंडारा आणि पोलीस अधीक्षक, भंडारा यांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार का? की पालांदूरकरांच्या जीवाशी असाच खेळ सुरू राहणार? याकडे संपूर्ण लाखनी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *