दांडेगावजवळील भीषण अपघाताने जिल्ह्यात खळबळ; दोन अल्पवयीन मुलांसह २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ल्ल पोलिस वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; टिप्परला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची तक्रारीत नोंद
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दांडेगावजवळ पोलिसांच्या सरकारी वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांच्या वाहनामुळेच तीन निष्पाप जीव गेल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलिसांच्या सरकारी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील दांडेगावजवळ हा भीषण अपघात घडला. शिवप्रसाद अरुण कांबळे (वय १६), रितेश जितेंद्र बावनकर (वय १६), दोघेही रा. खलबंदा, ता. जि. गोंदिया आणि कार्तिक बिजलाल बिसेन (वय २४), रा. सोनगावकला, ता. तिरोडा, जि. गोंदिया अशी मृत तरुणांची नावे आहेत.
घटनेच्या वेळी तिन्ही तरुण हिरो कंपनीच्या एचएफ डिलक्स दुचाकीने प्रवास करीत होते. त्याचदरम्यान गंगाझरी पोलीस ठाण्याचे सरकारी बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३५ एआर २२१० हे एकोडीच्या दिशेने जात होते. या सरकारी वाहनाचा चालक अमित बलिराम माहुले (वय ३७) हा समोरील टिप्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाºया दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघातानंतरपरिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या भीषण अपघातात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह एका २४ वर्षीय तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती दांडेगाव आणि परिसरातील गावांमध्ये पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांच्या वाहनामुळे तीन तरुणांचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर पेटवून पोलिस प्रशासनाचा निषेध केला.
अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. पोलिसांच्या सरकारी वाहनामुळेच तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असल्याने परिस्थिती चिघळू नये, यासाठी गंगाझरी पोलीस ठाण्यासमोर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या परिसराला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, मृत शिवप्रसाद कांबळे यांचे वडील अरुण प्रभाकर कांबळे (वय ४०, रा. खलबंदा) यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सरकारी बोलेरो वाहनाचा चालक अमित बलिराम माहुले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा क्रमांक ५४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेची जनरल डायरीमध्ये २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूपेश कटरे करीत आहेत.
निष्पक्ष चौकशीची अपेक्षा
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या सरकारी वाहनाचा अशा भीषण अपघातात सहभाग असल्याने या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनाचा वेग, ओव्हरटेक करताना घेतलेली खबरदा- री, अपघाताची नेमकी परिस्थिती आणि वाहनचालकाची जबाबदारी या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तीन तरुणांच्या मृत्यूला जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून अपघाताचे नेमके कारण आणि दोषी कोण, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी; पोलीस अधीक्षकांची भेट
अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ही बातमी समजताच मृतांच्या नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. आपल्या कुटुंबातील तरुणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनीही रुग्णालयात उपस्थित राहून कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच प्रशासनाकडून शक्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन नातेवाईकांना देण्यात आल्याची माहिती आहे.
