मृताच्या कुटुंबीयांची आक्रमक मागणी; अग्रवालकडून कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा भावाचा आरोप
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगलात घडलेल्या वर्षा तुरकर हत्याकांडाचा गोंदिया पोलिसांनी पदार्फाश केला आहे। या निर्घृण हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून, आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। वर्षा ज्या मित्रासोबत फिरायला गेली होती, त्याच मित्राच्या पत्नीने तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। या कटाचा उलगडा झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली आहे। मात्र, या हत्याकांडामुळे सर्वाधिक मोठा आघात वर्षाच्या कुटुंबावर झाला असून, अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील आईचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे।
वर्षा तुरकर हिची हत्या केवळ एका महिलेचा जीव घेणारी घटना नसून, एका तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेचे मातृछत्र हिरावून घेणारी दुर्दैवी घटना ठरली आहे। ज्या वयात मुलीला आईच्या मायेची, प्रेमाची आणि आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात तिच्या आईची हत्या करण्यात आली। त्यामुळे या चिमुकलीचे पुढील आयुष्य आता आईच्या मायेविना जाणार आहे। या घटनेने तुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केल्यानंतर मृत वर्षाच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे।
आपल्या मुलीची नियोजनपूर्वक सुपारी देऊन हत्या करण्यात आली। त्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकाही आरोपीला सोडू नये, सर्व आरोपींना तातडीने अटक करावी आणि दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आक्रमक मागणी वर्षाची आई प्रमिला तुरकर, भाऊ गणेश तुरकर आणि बहीण निशा पटले यांनी केली आहे। केवळ चार आरोपींना अटक करून हे प्रकरण थांबवू नये, तर या कटात सहभागी असलेल्या उर्वरित दोन आरोपींसह अन्य कोणाचा सहभाग असल्यास त्यांचाही शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे।
वर्षा’ला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील। आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे। यादरम्यान, वर्षाचा भाऊ गणेश तुरकर याने आणखी एक गंभीर आरोप केला आहे। अग्रवाल याच्याकडून आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे। या हत्याकांडानंतर कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी या आरोपाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी गणेश तुरकर याने केली आहे।
एकीकडे आईच्या हत्येमुळे तीन वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून कायमची पोरकी झाली आहे, तर दुसरीकडे आपल्या मुलीला गमावलेल्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे।
पैशांच्या सुपारीतून एका महिलेचा जीव घेतल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक करून संपूर्ण कटाचा पर्दाफाश करणे महत्त्वाचे ठरणार आहे। आता या प्रकरणातील उर्वरित आरोपी कधी पोलिसांच्या ताब्यात येतात, कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि न्यायालयीन प्रक्रियेत दोषींना कोणती शिक्षा होते, याकडे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मात्र, वर्षा’च्या तीन वर्षांच्या मुलीला आईचे प्रेम पुन्हा मिळणार नाही, ही या संपूर्ण हत्याकांडातील सर्वात वेदनादायी बाब आहे।
हत्या प्रकरणी चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी
तिरोडा : बोंडराणी जंगल परिसरात १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथील इंडिगो कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कार्यरत वर्षा तुरकर यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी मोना नितेश अग्रवाल (४१), इम्रान करीम शेख (२६), शाहरुख खान पठाण (३३) आणि कुणाल कुंभलकर (३१) या चौघांना अटक केली आहे। २१ नोव्हेंबर रोजी तिरोडा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।
मृतक वर्षा आणि नितेश अग्रवाल यांच्यातील प्रेमसंबंधांना कंटाळून नितेशची पत्नी मोना हिने कथितरित्या १३ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली।
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी तिरोडा, खैरलांजी, बालाघाट व गोंदिया मार्गावरील सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले। तसेच वाहनाचे जीपीएस लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले।
या प्रकरणातील फरार आरोपी क्रिश राऊत व नलेन शेख यांचा शोध सुरू असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र व वाहन जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने करीत आहेत।
