भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील देव्हाडा येथील मानस अँग्रो इंडस्ट्रिज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. युनिट-४ या साखर कारखान्यातील तब्बल २०० कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे या कामगारांची यंदाची दिवाळी अक्षरश: अंधारात गेली असून, कारखान्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, या कारखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना माहे मे २०२६ पासून पगार मिळालेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात हाताला काम व खिशात पैसा नसल्यामुळे कर्मचाºयांच्याकुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळीसारख्या सणातही मुलांच्या गरजा भागवणे अशक्य झाल्याने कर्मचाºयांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
३ वर्षांपासून पीएफची रक्कम रखडवली
केवळ वेतनाचाच प्रश्न नाही, तर या कारखानदार प्रशासनाकडून कामगारांच्या आर्थिक पिळवणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. कर्मचाºयांच्या वेतनातून दरमहा नियमानुसार भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमितपणे कपात केली जाते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून ही कपात केलेली रक्कम कर्मचाºयांच्या पीएफ खात्यात जमाच करण्यात आलेली नाही.कामगारांच्या हक्काच्या पैशांचा हा अपहारच असून, यामुळे कामगारांचे भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने थकीत वेतन व पीएफची रक्कम जमा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी तातडीने हस्तक्षेप करून कारखाना प्रशासनावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
