उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही, वडील मेंढपाळाचा व्यवसाय करणारे आणि सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमीचा कुठलाही आधार नाही. अशा अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या एका व्यक्तीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा स्वीकार करून केवळ स्वत:चेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे वैचारिक परिवर्तन घडविण्याचा ध्यास घेतला. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे दिलीप परसराम ढगे हे आज सिल्ली जिल्हा परिषद क्षेत्रात सामाजिक समता आणि सलोख्याचे जिवंत उदाहरण ठरले आहेत.
मूळचे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका (जगताप) येथील रहि-वासी असलेले दिलीप ढगे यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. वडील परसराम ढगे हे मेंढपाळाचा व्यवसाय करीत होते. घरात शिक्षणाचा गंध नव्हता. मात्र शिक्षण घेत असताना अॅड. वसंता रामटेके आणि प्रा. शिवदास उटाणे यांचा सहवास लाभला. याच काळात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले. बाबासाहेबांचे साहित्य वाचल्यानंतर त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तन हेच जीवनाचे ध्येय बनले. १९९४ मध्ये भंडारा तालुक्यातील बोरगाव (बुज) येथील मारोतराव कावळे विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून ते सेवेत रुजू झाले. तब्बल ३२ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यांनी नुकतीच सेवानिवृत्ती स्वीकारली. मात्र, त्यांच्यासाठी सेवानिवृत्ती म्हणजे सामाजिक कायार्तून निवृत्ती नव्हे. नोकरीच्या जबाबदाºया सांभाळतानाच त्यांनी समाजप्रबोधन आणि वैचारिक परिवर्तनाची चळवळ सातत्याने पुढे नेली.
बौद्ध विहार उभारण्यासाठी घेतला पुढाकार
समाजातील विखुरलेपणा दूर करून विविध जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावोगावी संपर्क साधून लोकवर्गणी गोळा केली. लोकसहभागातून गावात आकर्षक लुंबिनी बौद्ध विहार उभारण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. विशेष म्हणजे धनगर समाजात जन्मलेल्या दिलीप ढगे यांनी बौद्ध विहाराच्या उभारणीसाठी घेतलेला पुढ- ाकार हा केवळ वास्तू उभारण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो सामाजिक समतेचा आणि सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
विहारातून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली
विहाराची उभारणी केल्यानंतर त्यांनी त्याला केवळ धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे केंद्र न ठेवता ज्ञानाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, त्यांना महापुरुषांचेविचार समजावेत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुविधा मिळावी, या उद्देशाने विहारात अभ्यासिका केंद्र सुरू केले. येथे महापुरुषांची चरित्रे, वैचारिक साहित्य तसेच स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे गावातील आणि परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळाले.
जात नव्हे, तर माणूस आणि विचार महत्त्वाचा!
धनगर समाजात जन्म असूनही सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी त्यांच्या सामाजिक नेतृत्वाचा स्वीकार केला. त्यांच्या कार्यातून जातीय भेदभावापेक्षा माणुसकी, बंधुता आणि वैचारिक समृद्धी महत्त्वाची असल्याचा संदेशसमाजात पोहोचला. कोणत्याही जाती-धमार्ची चौकट न मानता समाजहिताला प्राधान्य देणारे त्यांचे कार्य आजच्या काळात विशेष प्रेरणादायी आहे. आजच्या सामाजिक वातावरणात जाती- धर्माच्या नावावर निर्माण होणाºया भिंती दूर करण्यासाठी दिलीप ढगे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची समाजाला गरज आहे. स्वत:च्या संघर्षातून मिळविलेली वैचारिक शिदोरी त्यांनी समाजाला दिली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हा विचारप्रसाराचा प्रवास सुरूच राहणार आहे. त्यामुळे दिलीप ढगे हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून समता, सामाजिक सलोखा आणि परिवर्तनाची प्रेरणा बनले आहेत.
